भाषा आणि न्यूनगंड

इंग्रजी बोलता न येण्याचा न्यूनगंड लोकांमध्ये जबरदस्त असतो. काहींचा हळूहळू तो जातो, काहींचा मात्र तो जात नाही. कारण, भाषा हा त्यांचा प्रांत नसतो. त्या बाबतीत ते दे धक्का म्हणत कामचलाऊ धक्का मारून वेळ मारून नेतात. पण मुद्दाम इंग्रजी बोल किंवा इंग्रजी लिही असं म्हटलं, तर मात्र गडबडतात. हे समजून घ्यावं, जमेल तसं समजून घ्यावं. त्यावर हसायची किंवा टीका करायची तशी काहीच गरज नाही. परंतु, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सहजपणे, मोठेपणाचा आव न आणता जाता येता काही शिकवायची संधी मिळाली, तर ती नक्की घ्यावी. अर्थात ही एक बाजू झाली.

ज्यांचा इंग्रजी भाषेचा न्यूनगंड जरा कमी होऊन ते हळूहळू इंग्रजी बोलू लागतात, कालांतराने अधिक बरे बोलू लागतात, ते कधी कधी फार विनोदी होऊन जातात. कारण ते जन्मापासून जी भाषा बोलत मोठे झालेले असतात, तिच्याविषयी आता वेगळा न्यूनगंड मनात बाळगायला लागतात. त्या भाषेला कमी लेखू लागतात. व्यवहारात ही भाषा चालणारच नाही, हे पक्कं ठरवून टाकतात. समोरचा माणूस आपल्यापेक्षा जास्त चांगलं इंग्रजी बोलू शकतो ह्याचा त्यांना अंदाज आला, तर ते समोरचा माणूस सहजच प्रांतीय भाषेत बोलायला लागला, तरी आपले तोडकं मोडकं इंग्रजी बोलतच राहतात. त्यांना कदाचित वाटतं की आपल्याला इंग्रजी येत नाही, म्हणून समोरचा आपल्याला समजेल अशा भाषेत बोलायला लागला आहे. मग ते आपले इंग्रजीचे ज्ञान त्याला दाखवतच राहतात. ते मुळातच सफाईदार बोलायच्या एका प्राथमिक टप्प्यावर असल्याने फार कृत्रिम वाटायला लागतो तो प्रयत्न.

इंग्रजी न येण्याचा न्यूनगंड बाळगणे तसे अनावश्‍यक असते, हे जितके खर; तितकेच नवशिक्‍यांनी आपल्या मातृभाषेला किंवा प्रांतीय भाषेला कमी लेखणे अनावश्‍यक असते. एकूणच भाषिक बुद्धिमत्ता वाढवायचा प्रयत्न करावा, भाषा कोणतीही असो. बोलीभाषा असो की, व्यावहारिक भाषा असो. स्थानिक असो की, परदेशी भाषा असो. हळूहळू आपल्याला भाषेची, व्यक्त होण्याची ट्रिक सापडत जाते. त्या त्या भाषेवर कमांड मिळवली की समोरचा सहजच ज्या भाषेत बोलायला लागतो, त्या भाषेत शिफ्ट होता आलं पाहिजे.

दोन मराठी माणसांनी मराठी येत असताना इंग्रजी बोलायचं काही कारण उरतं, असं मला तरी वाटत नाही. एक कुठली तरी भाषा “लै भारी’ आहे आणि एक काही तरी कमी भारी आहे, हे मुळातच आपल्या डोक्‍यातून काढून टाकलं पाहिजे. कोणत्याही भाषेचा व्यर्थ अभिमान देखील बाळगायचा नाही आणि व्यर्थ कमीपणा देखील भाषांना द्यायचा नाही. भाषिक अस्मिता उद्योग तर अजिबातच जवळ फिरकू द्यायचे नाहीत. पण ते जमणं तसं अवघडच! तरीही विचार तर करा!

– प्राची पाठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)