पुस्तकातील माणसे

गेल्या आठवड्यात माझ्या दिरांना सिंहासन कादंबरी हवी होती. फोन करून त्यांनी ती मागवली. खरं तर ती कादंबरी त्यांनीच आम्हाला दिलेली. आता जवळपास 25-30 वर्षांनी त्यांना ती पुन्हा हवीशी वाटली. आमच्या घरातली निम्मी जागा पुस्तकांनी भरलेली आहे. आणि त्यातील बहुतेक जागा धार्मिक पुस्तकांनी, पोथ्यापुराणांनी व्यापलेली. मात्र सारी पुस्तके अगदी टापटिप ठेवलेली. काही वेगवेगळ्या कपाटांमध्ये. काही गठ्ठे बांधून व्यवस्थित ठेवलेली.

अलीकडेच झालेल्या निवडणुकीच्या काळात माझ्या दिरांना अरुण साधूंनी ‘सिंहासन’ कादंबरीत रंगवलेल्या आणि चित्रपटात निळू फुले यांनी जिवंत केलेल्या निर्भीड, निष्ठावान पत्रकार दिगू टिपणीसची आठवण झाली होती. तसा पत्रकार म्हणे त्यांना कोठेतरी दिसला होता.

असे अनेकदा होते, पुस्तकातील माणसे आपल्याला कोठे तरी भेटतात वा उगाचच भेटल्यासारखी वाटतात. खरं तर बहुतेक पुस्तकातील व्यक्तिरेखांचे कोठे ना कोठे प्रत्यक्षात अस्तित्व असतेच. लेखक तरी सारे कल्पनेतून कोठे रंगवत असतो. त्यालाही इमला रचायला एखादी खरीखुरी विट हवी असते. त्याला जाता येता कोठेतरी एखाद्या माणसात, प्रसंगात, घटनेत एखादे बीज सापडते, आणि तो त्याचे छोटेसे रोपटे किंवा प्रचंड वटवृक्षही करून टाकतो. अनेक मोठ्या लेखकांनी आपल्या मुलाखतींमध्ये वा सहज बोलतानही अशी कबुली दिली आहे.

माझे वडील सांगत, विजय तेंडूलकर यांच्या त्यांच्या अतिशय गाजलेल्या सखाराम बाईंडरचे मूळ देखील एका सहज घडलेल्या घटनेतून सापडले होते त्यांच्या काळी गाजलेल्या “सामना’मधला हिंदुराव धोंडे पाटील असो की मारुती कांबळे असो या व्यक्तिरेखा अशाच आहेत. एके काळी अतिशय गाजलेला आणि आजही आठवणीत असलेलला शोलेतील गब्बरसिंग देखील प्रत्यक्ष व्यक्तिरेखेवरून निर्माण केला गेला होता. चंबळच्या खोऱ्यात कुठे तरी तो होऊन गेला होता, असे सांगतात.

लेखक खरी माणसे, खऱ्या घटना आपल्या पुस्तकात वापरतात पण ते त्यांचा थेट उल्लेख करू शकत नाहीत. पुढे कधी तरी त्यातली सच्चाई समोर येते आणि लोकांना भुरळ पाडून जाते.

शेवटी अनुभव म्हणजे तरी काय असतात? रोजच्या जगण्यातल्या काही घटनांचा त्या. ज्यात आपल्याभोवतालचे विश्‍व टिपले जाते. सुख आणि दुःख या दोन्ही बिंदूंचा जीवनातला आलेख जितका चढउतारांनी भरलेला तितकी अनुभवाची अनुभूती अधिक. यातलं दुःख जन्मापासून मरणापर्यंत सोबत असतं, त्याच्याशी जुळवून घेतलं तर आयुष्य सुलभ होतं. भूतकाळ आपल्या आठवणींच्या वळचणीला साठत राहतो. कधी तो काळजात उतरतो तर कधी मेंदूत उतरून शव्दरूप घेतो. आयुष्यातला प्रत्येक क्षण नेटका जगता आला पाहिजे, त्याचा अर्थ जाणता आला पाहिजे. चार अक्षरे लिहिण्यासाठी दोन क्षण नीट जगता आलं पाहिजे. मग ते आपोआप शब्दरूप घेते.

– अनुराधा पवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)