Lalu Prasad Yadav on RSS – केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातली आहे, या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, पीएफआयप्रमाणेच समाजात द्वेषभावना निर्माण करणाऱ्या ज्या अन्य संघटना आहेत, त्यावरही बंदी आदेश लागू केला पाहिजे.
सगळ्यात आधी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी घातली पाहिजे कारण ही संघटना पीएफआयपेक्षाही खतरनाक आहे. संघावर या आधी दोन वेळा बंदी आदेश लागू झाला आहे. यातील संघावरील सगळ्यात पहिली बंदी सरदार पटेल यांनी लागू केली होती ही बाबही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, लालूप्रसाद यादव यांनी आज पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला उखडून टाकणे हेच आपले उद्दिष्ट आहे. नितीशकुमारांना दिल्लीत पाठवून बिहार तेजस्वी यांच्याकडे सोपवण्याचा इरादाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या संबंधात ते म्हणाले की, आम्ही विरोधी आघाडीच्या संबंधात चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. केवळ त्यांच्या बरोबरचे फोटो वृत्तपत्रात यावेत यासाठी ही भेट नव्हती असे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली की आम्ही पुन्हा सोनियांना भेटणार आहोत असे ते म्हणाले.