नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सोमवारी समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र कायम असल्याचे चित्र आहे.
आगामी काळात भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी विरोधकांमधून ऐक्याचा सूर उमटू लागला आहे. त्यातून विरोधकांच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच दिल्ली दौरा केला.
त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या घडामोडींची चर्चा थांबत नाही तोच लालू-मुलायम भेट झाली. त्या भेटीवेळी मुलायम यांचे पुत्र आणि सपचे अध्यक्ष अखिलेश यादवही उपस्थित होते. त्या भेटीची माहिती लालूंनी ट्विटरवरून दिली.
शेतकरी, असमानता, गरीब आणि बेरोजगारांशी निगडीत समस्यांची आम्हाला चिंता वाटते. देशाला आज भांडवलशाही आणि जातीयवादाची नव्हे; तर समानत आणि समाजवादाची गरज आहे, अशी भूमिकाही लालूंनी मांडली. त्यांच्यात कुठली राजकीय चर्चा झाली याविषयीचा तपशील मिळू शकला नाही.