T20 World Cup 2024 (USA vs CAN) : पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट; हवामानाबाबत निराशाजनक अपडेट आली समोर…

T20 World Cup 2024 (USA vs CAN) : विश्वचषकाची मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिला सामना यूएसए आणि कॅनडा यांच्यात 2 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता होणार आहे. दोन्ही संघांचा हा सामना टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. सध्याच्या हवामानाचा आढावा घेतला तर पहिला सामना सुरळीत होण्याची शक्यता कमीच दिसते. अमेरिकेसोबतच कॅनडाही या सामन्यातून टी-20 विश्वचषकात पदार्पण करणार आहे, पण पावसामुळे खेळ खराब होऊ शकतो.
हवामान खराब करू शकते खेळ…
दरम्यान, अमेरिकेचे टेक्सास राज्य समुद्रकिनारी आहे, त्यामुळे येथे अनेकदा पाऊस पडतो. टी-20 वर्ल्ड कप 2024 अगदी जवळ आला आहे, परंतु टेक्सासमध्ये जवळपास दररोज पाऊस पडत आहे. अशा स्थितीत विश्वचषकाचा सलामीचा सामनाही पावसाचा बळी ठरू शकतो. ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याच्या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण राहील असे हवामानाच्या स्थितीवरून सूचित होते. पावसाची शक्यता 21 ते 24 टक्के राहील. अशा स्थितीत एक व्हिडिओही समोर आला आहे की, ज्यामध्ये मैदान आणि स्टेडियमचे स्टँड पाण्याने भिजल्याचे दिसत आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर कदाचित यूएसए विरुद्ध कॅनडा सामना रद्द करावा लागण्याची शक्यता आहे.
तीन सराव सामने पावसामुळे रद्द…
लक्षात घेतले तर, टी-20 विश्वचषकाचे सराव सामने 27 मे पासून सुरू झाले आहेत, जे 1 जून पर्यंत चालतील. ग्रँड प्रेरी स्टेडियमवर सराव वेळापत्रकात चार सामने आयोजित करण्यात आले होते. यातील चार सामन्यापैकी 3 सामने हे पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जर मुख्य स्पर्धेचे सामने रद्द झाले, तर पावसाळा पाहता टेक्सासमधील मैदान का निवडले गेले, अशा प्रश्नाचा नक्कीच आयसीसीवर पाऊस पडेल.





