बाबासाहेब गर्जे
पाथर्डी – श्रीक्षेत्र मढी यात्रेतील गाढवाच्या बाजारात आवक कमी झाल्याने भाव तेजीत होते. बाजारात गाढवांच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. मढीचा गाढवाचा बाजार देशात प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच राजस्थान, गुजरात, काठेवाड यासह अनेक राज्यातून काठेवाड, गावरान, खेचर, हलाटे या जातीची गाढवे बाजारात विक्रीसाठी आली होती.अनेक राज्यातील व्यापारी खरेदीसाठी मढी यात्रेतआले होते, मात्र भाव वाढल्याने अनेकांची निराशा झाली. व्यापारी भाव कमी करत नसल्याने ग्राहकांकडून सायंकाळी उशिरापर्यंत सौदे सुरू होते.
जातवान काठेवाडी गाढव 50 ते 70 हजारात विकले गेले तर गावरान गाढवाला 25- ते 35 हजारांचा भाव होता. तीनशे ते साडेतीनशे गाढवे विक्रीसाठी बाजारात आल्याचा अंदाज आहे.उंच डोंगरावरील वाहतुकीची कामे आजही गाढवाशिवाय होत नाहीत.दुर्गम भागात वीट भट्टीवर आजही गाढवाने माती वाहावी लागते, यासाठी कितीही भाव वाढला तरी खरेदी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे बेलापूर येथील बाबासाहेब बोरुडे यांनी सांगितले.
गाढवे खरेदी-विक्रीचा 40 वर्षाचा धंदा आहे. आमची चौथी पिढी या धंद्यात आहे. मढीच्या बाजारानंतर उरलेली गाढवे जेजुरी , माळेगाव येथे विक्रीला घेऊन जातो. घरी गाढवे घेण्यास ग्राहक येतात.
या व्यापारातून वर्षाकाठी लाख दीड लाखाचा नफा मिळतो. गेल्या काही वर्षापासून आंध्र प्रदेश राज्यात गाढवे कत्तलखान्यात जात असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होऊ लागली आहे, असे व्यापारी अविनाश बोरुडे यांनी सांगितले. सुनील नेवासा, नवनाथ बोरुडे ,किशोर जाधव ,रवी गायकवाड, सलीम भाई, अमोल नांदूर असे नामांकित व्यापारी गाढव विक्रीसाठी घेऊन आले होते. ग्राहकाबरोबरच परिसरातील नागरिकांनी गाढवांचा बाजार पाहण्यासाठी गर्दी केली होती.