गाजियाबाद – तरुण मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लुटणारा लखोबा लोखंडे महाराष्ट्रातील नाट्य जगतात अमर झाला. असला तरी याच लखाबा लोखंडाची महिला आवृत्ती उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांशी लग्न करून त्यांना लुटणाऱ्या एका वधूचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
‘मोनिका मलिक’ असे या महिलेचे नाव असून उत्तर प्रदेशातील कवी नगर येथे घडलेल्या एका घटनेनंतर तिने आतापर्यंत केलेली सर्व कृष्णकृत्ये उजेडात आली. मोनिकाने कवीनगर येथील जुगल किशोर नावाच्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांवर आपल्या प्रेमाचे जाळे फेकले जुगल किशोरने वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती, जाहिरातीचा आधार घेऊन मोनिकाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि लग्न केले गेल्या महिन्यात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला मात्र, काही दिवसात जुगल किशोर यांच्या लक्षात आले की आपल्या घरातील किमती सामान अचानक नाहीसे होत आहे.
काही दिवसातच जुगलकिशोर यांच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने नाहीसे झाले शंका आल्याने जुगल किशोर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांच्या नवपरिणीत वधूनेच त्यांना लुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी अधिक तपास केले असता मोनिकाने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये अशाप्रकारे आठ लोकांशी लग्न करून त्यांची अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.
उत्तर प्रदेशातील खन्ना विवाह एजन्सीच्या माध्यमातून मोनिका आपल्या शिकार शोधत होती तिने आत्तापर्यंत केलेले सर्व विवाह निवृत्त अधिकाऱ्यांशी केले आहेत. राजधानी नवी दिल्लीत एक निवृत्त न्यायाधीशही मोनिकाचा शिकार ठरला आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी मोनिका मलिका विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.