आंबेगाव बुद्रुक – लिपाने वस्तीमधील गणंजय सोसायटीमधील महिला नैराश्येतून आत्महत्या करण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गावरील जांभुळवाडी पुलावर विरुद्ध दिशेने अनवाणी पायी चालत जात होती. याची माहिती जांभूळवाडी येथील सजग नागरिक राजेंद्र लिपाणे यांनी दत्तनगर परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून दत्तनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. महिलेस आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; परंतु महिला ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे रस्त्यावरून दुचाकीवरून जाणाऱ्या रूपाली घोडके या महिलेच्या मदतीने सदर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केली असता आत्महत्या करणार असल्याचे तिने सांगितले.
महिला पोलीस शिपाई जगताप यांच्यामार्फत प्रबोधन करून तिचे नातेवाईक प्रशांत शेळके यांच्या ताब्यात तिला देण्यात आले. या कामासाठी सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, पोलीस नाईक कातांगळे, पोलीस शिपाई मांडगे, धोत्रे यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.