मुंबई – मुंबईमध्ये अंडरवर्ल्डमध्ये वेगवेगळ्या डॉनचा मुक्त संचार आणि कारवाया सुरु असतात. विविध उपनगरांतल्या झोपडपट्टया आणि औद्योगिक तसेच कामगार वसाहतींमध्येही अनेक लहान-मोठे डॉन असतातच. या क्षेत्रात एक महिला असून कुख्यात असलेल्या करीमा आपाला पूर्ण मुंबापुरी ओळखते; जणू काही ती डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचीच वारस असावी.
मुंबई उपनगरातील स्लम क्वीन म्हणून कुख्यात असलेल्या करीमा मुजीब शाह उर्फ करीमा आपा हिला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. तिच्यासह तीन हस्तकांनाही बेड्या ठोकल्या आहेत. अवैध शस्त्र पुरवल्याच्या प्रकरणात तिचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
फहिम मचमच या टोळीतील गुंडांना अवैध शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणात करीमा आपाचं नाव समोर आले होते. गेल्याच आठवड्यात खंडणीविरोधी पथकाने मचमच टोळीतील तिघांना अटक केली होती. विनोद गायकवाड, फझलू रेहमान उर्फ मुज्जू आणि मोहम्मद शाह यांना कांजूरमार्ग येथून अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या टोळीशी करीमा आपाचे कनेक्शनअसल्याची माहिती रेहमानच्या फोनमधून मिळाली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा एकेकाळी दबदबा होता. हसीना पारकरला लोक हसीना आपा या नावाने ओळखत होते. कालांतराने तिची मुंबईवरची पकड सैल होत गेली. त्याचदरम्यान एका नाव चर्चेत आले. करीमा आपा. करीमा रातोरात अवैध झोपड्या उभारून ती विकायची. तसेच तिच्यावर शस्त्रे खरेदी-विक्री करण्याचाही आरोप आहे. खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही तिचे नाव समोर आले आहे.