हेलसिंकी – जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जाणाऱ्या फिनलॅंडमध्ये सध्या कामगारांची टंचाई तीव्र टंचाई जाणवत असून इतर देशातील लोकांनी या देशात वास्तव्य करावे यासाठी हा देश प्रोत्साहन देत आहे.
फिनलंड हा देश आपल्या देशातील चांगल्या सोयीसुविधा उच्च प्रकारची जीवनशैली आदर्श यंत्रणा यामुळे ओळखला जात असला तरी या देशातील तरुण वर्गाची लोकसंख्या खूपच कमी आहे.
जपानच्या पाठोपाठ म्हाताऱ्या लोकांचा देश म्हणून आता फिनलॅंडची ओळख होत आहे. त्यामुळे या देशाला मोठ्या प्रमाणावर तरुण कामगारांची टंचाई भासत आहे. अकॅडमी ऑफ फिनलॅंडचे रिसर्च फेलो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सरकार आणि काही उद्योग यांच्या निष्क्रियतेमुळे देशाची सध्याची ही अवस्था झाली आहे.
लोकसंख्या म्हातारी होऊ लागल्याने या देशाला तरुण लोकसंख्येची गरज आहे. सयुंक्त राष्ट्र संघाच्या अहवालाप्रमाणे फिनलॅंडमध्ये प्रति 100 लोकांमागे 40 पेक्षा जास्त लोक 65 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचे आहेत. 2030 पर्यंत हा आकडा 48 पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमध्ये फिनलॅंडने सतत चार वर्षे पहिला क्रमांक पटकावला असला तरी आता या कामगारांच्या आणि तरुण लोकसंख्येच्या टंचाईमुळे या देशासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे इतर देशातील लोकांनी या देशात येऊन वास्तव्य करावे यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आल्या आहेत.