‘अन् मला शंका आली…’ लस घेतल्यानंतर खासदार मिमी चक्रवर्तींकडून बनावट लसीकरण केंद्राचा पर्दाफाश

वाचा मिमी चक्रवर्तींनी कस ओळखलं बनावट लसीकरण केंद्र...

कोलकाता – देशातील करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. दररोज सापडणाऱ्या नव्या बाधितांची संख्या घटल्याने सक्रिय बाधितांची संख्या देखील कमी झालीये. असं असलं तरी विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम असून ती टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेस वेग देण्यात आलाय. अशातच पश्चिम बंगालमधून एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यातील कसबा भागात एका भामट्याने IAS अधिकारी असल्याचे भासवत चक्क नकली लसीकरण केंद्र उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

विशेष म्हणजे या नकली लसीकरण केंद्रावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार व अभिनेत्या मिमी चक्रवर्ती यांनी देखील लस घेतली होती. मात्र चक्रवर्ती यांनी लस घेतल्यानंतर सरकारतर्फे येणारा एसएमएस न आल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यानंतर त्यांनी त्वरित या लसीकरण केंद्रावरील कामकाज बंद पाडत याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी चौकशी केली असता, आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या या भामट्याचे नाव दिबांजन देब असल्याचे समोर आले. तो, आपण कोलकाता महापालिकेचा सहआयुक्त असल्याची बतावणी करत होता.

“या लसीकरण केंद्रावर अनेकांनी आपले लसीकरण करून घेतले असून आम्ही या लसी फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवल्या आहेत. जर लसी बनावट असल्याचं समोर आलं तर ज्यांनी ज्यांनी या केंद्रावर लसीकरण करून घेतलं आहे त्यांना पुन्हा लस घेण्यास सांगू.” अशी माहिती कोलकता येथील एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती देताना खासदार चक्रवर्ती यांनी सांगितले की, “मला या केंद्रावरून येथे येऊन लस घ्यावी अशी विनंती करण्यात आलेली. येथे तृतीयपंथींचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती मला देण्यात आलेली. मात्र लस घेतल्यानंतर मला कोणताही संदेश प्राप्त झाला नाही, म्हणून मला याबाबत शंका आली. मी त्वरित लसीकरण केंद्रावरील सर्व कामकाज बंद पाडून पोलिसांना माहिती दिली.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.