दुबई – कोलकाता नाईट रायडर्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आयपीएलमध्ये आपल्या उर्वरित सामन्यांना मुकणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे कुलदीप यादव भारतात परतला आहे. तो आता देशांतर्गत स्पर्धांनाही मुकण्याची शक्यता आहे.
कुलदीप कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. अर्थात आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याला सुमार कामगिरीमुळे अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळालेली नव्हती. सरावादरम्यान कुलदीपच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुढे कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकेल असे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. कुलदीप यादवच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून, तो पुढील 4 ते 6 महिने क्रिकेट खेळू शकणार नाही.