पारनेर -करोना संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीस घेण्यासाठी केंद्र पारनेर येथे करण्यात आले आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील करोना संशयित रुग्णांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्या ऐवजी पारनेर येथेच त्यांचा स्त्राव नमुना घेतला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
पारनेर येथे मुलींच्या वसतिगृहाची इमारत संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी घेण्यात आलेली आहे. या ठिकाणीच हे कोविड-19 सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे करोना संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये कान्हूर पठार येथील एका संशयित रुग्णाचा स्त्राव घेण्यात आला आहे. या करोना संशयितांचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असून, त्याने मुंबईहून शेवगाव येथे काही प्रवासी सोडले होते. त्यातील शेवगाव तालुक्यातील प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयिताचा स्त्राव घेऊन करण्यात आली आहे. तसेच अहवाल येईपर्यंत या व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या केंद्रातून रुग्णांचे स्त्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात येणार आहेत. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, राजेश गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, डॉ. उदरे, डॉ. सुदाम बागल आदी
उपस्थित होते.
संशयीत रुग्णांना मिळाला दिलासा
पारनेर येथे संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव घेण्यासाठी केंद्र सुरू झाल्यामुळे नगर येथे संशयित रुग्णांना जाण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यामुळे संशयित रुग्णांचा वेळ वाचणार असून, नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्त्राव घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. ही सुविधा पारनेर येथे झाल्याने संशयित रुग्णांना दिलासा मिळाला आहे.