कोल्हापूर – विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या 12 जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फेटाळतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विनय कोरे यांना खासगीत सांगितल्याचा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.
कोल्हापूरात आज हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुश्रीफ म्हणाले, माजी मंत्री,आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. यावेळी कोरे यांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व जिल्हा बॅंकेचे संचालक भैय्या माने गेले होते.
या ठिकाणी काही वेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील दाखल झाले. सांत्वन केल्यानंतरच पाचच मिनिटात त्यांनी राज्यपालांकडून निवडलेल्या विधानपरिषदेच्या 12 सदस्यांबाबत धाडसी वक्तव्य केले. मंत्रीमंडळाने जरी 12 नावांची शिफारस केली तरी ही नावे बाजुला ठेवण्याबाबत राज्यपाल व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे कोरे तुम्ही काही काळजी करु नका, असा सल्ला यावेळी आमदार पाटील यांनी दिला असल्याचा गौफ्यस्फोट मुश्रीफ यांनी केला. मात्र काहीवेळाने आमदार पाटील यांना या ठिकाणी भैय्या माने उपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.