पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपने तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यानंतर आजी-माजी आमदरांमध्ये आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. याचीच प्रचिती सोमवारी पुन्हा महापालिकेत दिसून आली.
कोथरूडमधील प्रश्नांबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोलवलेल्या बैठकीस माजी आमदार मेधा कुलकर्णी अनुपस्थित होत्या. मात्र, त्यानंतर काही वेळातच एका कचरा प्रकल्पाबाबत आयुक्तांची कुलकर्णी यांनी भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या भेटीची महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.
विधानसभेत सुरक्षित मतदारसंघ म्हणून भाजपने कुलकर्णी यांचे तिकीट कापत प्रदेशाध्यक्षांना उमेदवारी दिली. त्यानंतर कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही काळ कुलकर्णी फारशा सक्रीय नव्हत्या. मात्र, काही महिन्यांपासून त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. असे असतानाच, अवघ्या वर्षभरापूर्वी आमदार असलेल्या कुलकर्णी या आपल्याच मतदारसंघाच्या बैठकीला उपस्थित नसल्याने त्या अजूनही नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यात अवघ्या काही मिनिटांतच त्या आयुक्तांना भेटण्यासाठी नागरिकांसह आल्या. प्रदेशाध्यक्ष तथा आमदार पाटील पालिकेतून गेल्यानंतर कुलकर्णी यांना आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुढील काही दिवसांत कोथरूडचे राजकारण आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे.