मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर तब्बल सहा तास साक्ष नोंदवण्यात आली. शुक्ला यांनी पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. दरम्यान भीमा कोरेगाव दंगल उसळली त्यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावणार आहेत.
या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सांगितले की, रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केले. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ऍड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे.
हिरे म्हणाले, 1 जानेवारी 2018 ला जेव्हा भीमा-कोरेगावची घटना घडली तेव्ही विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून ते काम करत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा मागणी अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी केला. त्यावर आयोगाने आदेश केला आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचे प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.