पुणे –येरवड्यातील शास्त्रीनगर भागात नियोजित व्यावसायिक संकुलाच्या इमारतीच्या पायात बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांचा मोठा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. दुर्घटनेत चार मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बांधकाम मजूर मूळचे बिहारचे आहेत. सोहेल मोहम्मद (वय 22), मोहम्मद समीर (वय 30), मोबिद आलम (वय 40), मजरूम हुसेन (वय 35), तकाजी आलम (वय 40) अशी मृत्यमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत.
दुर्घटनेत राज्य सरकारकडून मदतीची घोषणा
येरवडा भागात झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. पवार यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली असून जखमी कामगारांवर उपचार करताना काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
काम थांबविण्याचे महापालिकेचे आदेश
दुर्घटनेनंतर, संबंधित बांधकामासह, या विकसकाची शहरातील इतर सर्व कामे थांबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. हे बांधकाम सुमारे दोन हेक्टर जागेवर सुरू होते. या बांधकामास महापालिकेने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानंतर ऑग़स्ट 2021 मध्ये या बांधकामाच्या इमारत आराखडयाच्या शेवटच्या ले आऊटला मान्यता देण्यात आली असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मोहम्मद आलम मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद फईम मोहम्मद कुरवान, मोहम्मद रफीक आलम, मोहम्मद साहील मोहम्मद मुस्लीम जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कंपनीचे विकसक फारूक वाडिया आहेत. प्राथमिक पोलीस चौकशीत बांधकाम व्यावसायिक कंपनी, ठेकेदार दुर्घटनेस जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी अहलुवालिया बांधकाम कंपनीचे संचालक तसेच मोहन अचलकर, एमसीपीएल कंपनीकडून काम करणारे ठेकेदार शरीफ, सीएनडब्ल्यू कंपनीचे सुरक्षाविषयक पर्यवेक्षक सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. बांधकाम मजूर मोहम्मद नाहीद मोहम्मद मास्टर (वय 21, सध्या रा. लेबर कॅम्प, गुंजन चित्रपटगृहाजवळ, येरवडा, मूळ रा. धचना, चांदपारा, बरसोई घाट, जि. कटिहार, बिहार) याने यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील शास्त्रीनगर भागात ब्ल्यू ग्रास बिजनेस पार्क या नियोजित व्यावसायिक संकुलाचे काम सुरू आहे. इमारतीचा पाया खोदण्याचे काम सध्या सुरू असून त्यावर लोखंडी सळ्यांपासून करण्यात आलेला मोठा सांगडा बसविण्यात आला आहे. गुरुवारी (3 फेब्रुवारी) रात्री अकराच्या सुमारास लोखंडी सांगड्याखाली दहा मजूर काम करत होते. त्यावेळी लोखंडी सांगड्याचा काही भाग मजुरांवर कोसळला आणि मजूर दबले गेले.
या घटनेची माहिती तेथे काम करणाऱ्या मजुरांनी त्वरित अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल गिलबिले, विभागीय अधिकारी रमेश गांगड यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन बंब, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पायाचा विस्तार मोठा असल्याने आत नेमके कितीजण दबले गेले आहेत, याबाबतची माहिती सुरुवातीला मिळाली नाही. अंधार असल्याने प्रकाशझोत सोडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. लोखंडी सांगड्याचा काही भाग कटरच्या सहाय्याने कापून जवान आतील भागात उतरले. दबलेल्या दहा मजुरांचा अंधारात शोध घेण्यात आला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी
येरवड्यातील नियोजित व्यावसायिक संकुलाच्या इमारतीत झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेकडून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तथ्य शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असून दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक तथ्य शोध समिती स्थापन केली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख या समितीचे अध्यक्ष आहेत. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अभिजीत केतकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले, कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त अभय गिते, स्थापत्य अभियंता धैर्यशील खैरे पाटील, वास्तुविशारद संदीप बावडेकर, क्रेडाइचे संजय देशपांडे आदींची या समितीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम या समितीत सदस्य सचिव आहेत.