सियोल – लोकप्रिय कोरियन गायिका ली संग युन हिचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. परफॉर्मन्सआधी वॉशरुममध्ये तिचा मृतदेह सापडला आहे. ली संग युन हिच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण तिच्या निधनाने कोरियन संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
कोरियन मीडियाच्या अहवालानुसार, ली चा मृतदेह एका वॉशरुममध्ये सापडला आहे. कार्यक्रमाआधी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला ली संग युन या वॉशरुममध्ये पडलेल्या दिसली. त्यानंतर लगेचच त्या व्यक्तीने कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजकाने दिलेल्या माहितीनुसार, ली संग युनच्या परफॉर्मन्सला सुरुवात होणार असल्याने आम्ही त्यांना शोधायला सुरुवात केली. बॅकस्टेजलाही ती दिसली नाही. अशातच एक व्यक्ती पळत आला आणि ती वॉशरुममध्ये पडली असल्याचे त्याने आम्हाला सांगितले.
ली च्या निधनानंतर तिचा मृत्यू कसा झाला? हत्या की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी ली च्या मृत्यूप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली आहे. ली ही लोकप्रिय गायिका होती. एका पेक्षा एक गाणी त्यांनी गायली आहेत. सियोल राष्ट्रीय महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले होते.
तीन महिन्यांत चार कोरियन गायिकांचे निधन
गेल्या तीन महिन्यांत चार कोरियन गायिकांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच गायिका कोको लीने आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी, गायक चोई सुंह बोंगने आत्महत्या केली होती. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने आत्महत्येबद्दल सांगितले होते. के-पॉप गायक हेसूने देखील गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत आयुष्य संपवले. आता गायिका ली संग युनच्या निधनाची बातमी समोर आली आहे.