कोल्हापूर – कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर स्थगित झालेली महापौर फुटबॉल स्पर्धा तब्बल दोन वर्षांनी खेळवण्यात आली. अंतिम सामन्यात बलाढ्य दिलबहार तालीम संघाने अटीतटीच्या लढतीत तुल्यबळ प्रॅक्टीस फुटबॉल क्लबला टायब्रेकरमध्ये (३-२) असे हरवत महापौर चषकावर नाव कोरले. पूर्णवेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता. अंतिम सामन्यासाठी प्रॅक्टिसने गोलरक्षक प्रविण बलबीरसिंगला गुजरातमधून तर दिलबहारने नायजेरियन खेळाडू रोमारिकला दिल्लीहून पाचारण केले होते.
पावनेदोन वर्षे खंडीत झालेला फुटबॉल हंगाम यंदा महापौर चषक फुटबॉल स्पर्धेने सुरू झाला. अंतिम सामन्यात दिलबहार आणि प्रॅक्टिस संघाने जोरदार चढाया करत गोलची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. प्रॅक्टिसचा कैलास पाटील, सागर चिले, जय कामत यांनी जोरदार चढाय केल्या पण गोल करण्यात अपयशी ठरले. दिलबहारच्या सचिन पाटीलचा मैदानावर चौफेर खेळ होता. नायजेरियन स्ट्रायकर रोमारिकच्या चढाया धडकी भरवणाऱ्या होत्या पण गोलरक्षक प्रविण बलबिरसिंगने उत्कृष्ट गोलरक्षण करत भक्कम बचाव केला. पूर्णवेळ सामना बरोबरीत राहिल्यावर पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला.
टायब्रेकरमध्ये दिलबहारच्या सनी सनगर, प्रमोद पांडे, रोमारिकने तर प्रॅक्टिसच्या जय कामत, राहूल पाटील यांनी अचूक फटके मारले. दिलबहारच्या सचिन पाटील आणि अनिकेत जाधव यांचे फटके गोलरक्षक बलबिरसिंगने सूर मारुन रोखले. पण प्रॅक्टिसच्या प्रतिक, कैलास पाटील, प्रकाश संकपाळ यांचे फटके बाहेर केले.
विजेत्या दिलबहार संघाला रोख दीड लाख आणि चषक तर उप विजेत्या प्रॅक्टिस संघाला रोख ७५ हजार रुपये आणि चषक श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उप महापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक अदिल फरास, भूपाल शेटे, प्रताप जाधव, सचिन पाटील, माजी नगरसेविका जयश्री जाधव, केएसए सचिव माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.