कोहली ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

आयसीसीकडून धोनीचाही खेळभावना पुरस्काराने गौरव

दुबई  – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. कोहलीला या दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा सर गॅरी सोबर्स पुरस्कार तर खेळभावना पुरस्कार धोनीला जाहीर झाला आहे.

2011 साली नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटी मालिकेत पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीने धावबाद दिले होते. त्यावेळी धोनीने मनाचा मोठेपणा दाखवून बेलला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले होते. धोनीच्या या खेळभावनेमुळे त्याला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार मिळाला आहे.

कोहलीने 2010 ते 2020 या दशकात एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा रतिब घातला आहे. सर्वात जलद 12 हजार धावा करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रमही त्याने मागे टाकला. या दशकात 39 शतके, 48 अर्धशतके तसेच 112 झेल कोहलीच्या नावावर आहेत. या दशकात कोहलीने 10 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळेच त्याची दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच दशकातील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा सर गॅरी सोबर्स पुरस्कारासाठीही कोहलीची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-20 क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी ठरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.