वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कार्मिक व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे कायदेतज्ञ आणि नागरी अधिकार कार्यकर्ते किरण आहुजा यांची नियुक्ती केली आहे. आहुजा हे आशियातील नागरिकांशी संबंधित व्यवहारांमध्येही लक्ष घालणार आहेत. बायडेन यांच्या प्रशासनामध्ये भारतीय वंशाच्या किमान 20 जणांची वरिष्ठ पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सर्वांसह आहुजा या देखील आता आपल्या नवीन जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत.
बायडेन यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारण्यासाठी जे वरिष्ठ अधिकारी कार्यरत होते, त्यामध्ये किरण आहुजा यांचाही समावेश होता. नवीन प्रशासनाने सुरळीतपणे सत्तेची सूत्रे घ्यावीत, यासाठी सक्रिय असलेल्या पथकाचे नेतृत्व त्या करत होत्या. कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्यावतीने अमेरिकेतल्या प्रांतांमधील प्रशासकीय सेवा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये समन्वय आणि निवृत्तीनंतरच्या तसेच विम्याशी संबंधित लाभाच्या व्यवहारांमध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. पूर्वी बराक ओबामा यांच्या कारकिर्दीमध्ये किरण आहुजा यांनी कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्या चीफ ऑफ स्टाफ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता कार्मिक कार्यालयाच्या प्रमुख म्हणून त्यांच्या नियुक्तीवर सिनेटकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक असेल.
किरण आहुजा सध्या सेवाभावी संस्थांचे नेटवर्क आलेल्या “फिलांथ्रोफी नॉर्थवेस्ट’या पालक संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सक्रिय आहेत.