प्योंगयांग – माजी सर्वोच्च नेता किम जोंग इल यांच्या निधनाच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त उत्तर कोरियातील नागरिकांना 10 दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात देशातील जनता ना हसू शकते ना दारू पिऊ शकते. सरकारी आदेशात, उत्तर कोरिया किम जोंग इलच्या मृत्यूवर शोक करत असताना जनतेला आनंदाच्या कोणत्याही कार्यात सहभागी न होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेडिओ फ्री एशियाशी बोलताना सिनुइजू शहरातील रहिवासी म्हणाले की, शोक काळात लोक दारू पिऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत किंवा किराणा सामान खरेदी करू शकत नाहीत. या कालावधीत निर्बंधांचे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील, असे त्या व्यक्तीने सांगितले.
नाव न सांगण्याच्या अटीवर त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, “पूर्वी, जे लोक मद्यपान करताना किंवा शोकाच्या वेळी आनंद साजरा करताना आढळले होते, त्यांना वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करून शिक्षा केली जात असे. त्यांना पकडून नेण्यात आले आणि ते पुन्हा कधीही दिसले नाहीत.
शोकाच्या काळात, एखाद्याच्या कुटुंबात मृत्यू झाल्यास, जवळच्या नातेवाईकांना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि अंत्यसंस्कार देखील केले जाऊ शकत नाहीत. 11 दिवसांचा शोक संपल्यानंतरच मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेला जाऊ शकतो. असे म्हटले जाते की या काळात लोक त्यांचा वाढदिवस साजरा करू शकत नाहीत.