धाराशिव – जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकाने अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपीत डॉक्टर हा गर्भवती महिलांना कर्नाटकात नेऊन हा सगळा प्रकार करायचा अशी माहिती आहे. या प्रकारणात एका एजंटला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून मोबाईल, महिलांची यादी असे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्हा रुग्णालयाच्या गर्भलिंग निदान प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली. कर्नाटकातल्या कलबुर्गी येथील डॉ. गुरुराज कुलकर्णी हा अवैधरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करत असल्याची माहिती धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयातील पथकाला मिळाली होती.
पथकाच्या सदस्यांनी सापळा रचत एका गर्भवती महिलेस वीस हजार रुपये देऊन एजंटमार्फत या डॉक्टरकडे पाठवण्याचा प्लॅन केला. मात्र डॉक्टरने अचानक ठिकाण बदलले. त्यामुळे या प्रकरणातील एजंट खुदास कादरी हा एकटाच पथकाला रंगेहाथ सापडला. त्याच्याकडून मोबाईल, महिलांची यादी तसेच मागणी केलेल्या वीस हजार रुपये असे जप्त करत रंगेहाथ पकडण्यात आले.
धक्कादायक बाब म्हणजे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईत देखील डॉ. गुरुराज कुलकर्णी याचे नाव समोर आले होते. या डॉक्टरचा एजंट जरी ताब्यात सापडला असला तरी मास्टरमाइंड डॉक्टरवर अजूनही कारवाई होत नसल्याने डॉक्टरला कोण पाठीशी घालतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.