सोलापूर (प्रतिनिधी) – उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील डॉक्टरचे खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून लुटलेल्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने चार दिवसात जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील चार आरोपी हे पुण्यातील आहेत .
विकास सुभाष बनसोडे (वय 31), सिद्धार्थ उत्तम सोनवणे (वय 42, दोघेही रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रोहित राजू वैराळ (वय 28, रा. वडगाव बुद्रुक, भवानीनगर, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय 28, रा. साईधाम, तालुका हवेली, जिल्हा पुणे), वैभव प्रवीण कांबळे (उस्मानाबाद ) भारत दत्तात्रय गायकवाड आणि मुराद हनिफ शेख (दोघे रा. सोलापूर )अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, 21 सप्टेंबर रोजी डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (वय 47) बीबीदारफळ ते कोंडी गावच्या रस्त्याच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी गावठी बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांचे अपहरण करून 1 कोटींची खंडणीची मागणी केली. या दरम्यान आरोपींनी डॉ. कुलकर्णी यांना मोहोळ, पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड मार्गे वारजे माळवाडी पुणे येथे नेऊन त्यांच्याकडील एकूण पाच लाख 88 हजार 420 रुपयांचा ऐवज काढून घेतला आणि डॉ. कुलकर्णी यांना पुण्यातील वारजे माळेवाडी येथे गाडीतून ढकलून दिले.
यानंतर डॉ. अनिल कुलकर्णी यांनी दोन दिवसांनी झालेला संपूर्ण प्रकार तालुका पोलीस स्टेशनला सांगितला. तालुका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथकाने पुणे शहर गाठले. या पथकाने वडगाव, सिंहगड रोड पानमळा पुणे येथून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सर्व सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली ईनोवा कार व एक दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे ,मोहन मनसावाले, अक्षय दळवी आणि चालक समीर शेख यांनी ही कामगिरी बजावली.