पिंपरी – काळेवाडी येथील खुशी मुल्ला या महिला खेळाडूची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख तसेच खुशी मुल्ला यांचे वडील नवीलाल मुल्ला, संजय गायके आदी उपस्थित होते. खुशी मुल्ला हिने थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे 10 वर्षांपुर्वी प्रवेश घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यांनी 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 23 वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.
कर्णधार खुशी म्हणाली, लहाणपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ देखील राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळायचा त्यामुळे साहजिक क्रिकेटविषयी आवड व प्रेम निर्माण झाले. माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर, शादाब शेख यांच्यासह इतर मार्गदर्शकांनी माझ्याकडून उत्तम सराव करून घेतल्याने माझा आत्मविश्वास वाढला.