पुणे – जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करता येते. आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्हाला घाबरवू शकतात परंतु तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास तुम्हाला भीतीवर मात करून तुमची ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यात मदत करतात. झारखंडमधील एका मुलीला लहानपणापासून अशाच भीतीचा सामना करावा लागला. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी नक्षलवादी आहेत. येथे राहणारे लोक नक्षलवादाचा सामना करत आहेत. मात्र, पूर्वीच्या तुलनेत नक्षलवाद्यांच्या दहशतीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
मात्र नक्षलवाद्यांमुळे निष्पाप मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले तर तिचे बालपण भीतीच्या छायेत जाणे स्वाभाविक आहे, पण या मुलीने हार मानली नाही. तिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम केला. हे यश मिळविले आहे 19 वर्षीय सुप्रीती कच्छप ( Supriti Kachhap ) हिने.
चला जाणून घेऊया कोण आहे सुप्रीती कच्छप, तिचे बालपण कसे होते आणि संघर्षावर मात करून तीने खेलो इंडिया स्पर्धेत स्थान मिळवत कशाप्रकारे सुवर्णपदक पटकावले.
सुप्रीती कच्छपचे यश
सुप्रीती कच्छप ही झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहे. 19 वर्षीय सुप्रीती ही एक अॅथलीट आहे, जिने अलीकडेच पंचकुला येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. यासह नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. सुप्रीतीने 3000 मीटर शर्यतीत 9 मिनिटे 46.14 सेकंद वेळ नोंदवत पाच वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
सुप्रीती कच्छप हिचा जीवन परिचय
मात्र, इथपर्यंतचा प्रवास सुप्रितीसाठी सोपा नव्हता. सुप्रीती ही झारखंडमधील बुरहू गावची आहे. तिचे गाव नक्षलग्रस्त भागात येते आणि याच नक्षलवाद्यांनीच वर्षापूर्वी सुप्रीतीला असह्य दु:ख दिले होते. झारखंडमध्ये जन्मलेल्या सुप्रितीच्या वडिलांचे नाव रामसेवक ओराव आणि आईचे नाव बालमती होते. सुप्रीतीसह मुलांचे पालनपोषण करण्यासाठी रामसेवक वैद्य म्हणून काम करायचे. आजूबाजूच्या गावात जाऊन रुग्णांवर उपचार करायचे. 2003 मध्ये रामसेवक डिसेंबरच्या रात्री घरी परतले नाही. पाच मुले आई बालमतीसह वडिलांच्या परतीची वाट पाहत होते, मात्र 2003 मध्ये नक्षलवाद्यांनी सुप्रितीचे वडील रामसेवक ओराव यांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांचा मृतदेह झाडाला बांधला होता.
सुप्रितीची आई बालमती देवी यांनी सांगितले होते की, वडिलांच्या मृत्यूच्या वेळी सुप्रीती खूपच लहान होती. बालमतीसाठी एकट्या सुप्रितीसह तिच्या पाच मुलांचे संगोपन करणे कठीण संघर्षाने भरलेले होते. पण त्याने धीर सोडला नाही. पतीच्या निधनानंतर बालमती यांना गुमला येथील घाघरा ब्लॉकमधील बीडीओ कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. आणि कुटुंब तिथल्या सरकारी क्वार्टरमध्ये शिफ्ट झालं.
वडिलांच्या निधनाच्या वेळी सुप्रीती खूपच लहान होती. तिला तिच्या वडीलाच्या हत्येबदल काही आठवतही नाही. बालमतीसाठी सुप्रितीसह तिच्या पाच मुलांचे संगोपन करणे कठीण संघर्षाने भरलेले होते. पण त्यांनी धीर सोडला नाही. पतीच्या निधनानंतर आईने सर्व मुलांना वाढवले. पतीच्या निधनानंतर बालमती यांना गुमला येथील घाघरा ब्लॉकमधील बीडीओ कार्यालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे राहण्यासाठी सरकारी क्वार्टरमध्ये घरही मिळाले आणि इथूनच सुप्रीतीने धावण्याचा कारकीर्दीस सुरूवात केली.
सुप्रितीची कारकीर्द
यानंतर सुप्रीतीला प्रथम नुक्रुडिप्पा चैनपूर शाळेत दाखल करण्यात आले, जिथे ती मातीच्या छोट्या ट्रॅकवर धावत असे. नंतर तिला गुमला येथील सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये शिष्यवृत्तीवर दाखल करण्यात आले, जिथे प्रशिक्षक प्रभात रंजन तिवारी यांनी 2015 मध्ये झारखंड क्रीडा प्रशिक्षण केंद्रात तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
सुप्रीतीला लहानपणापासूनच अॅथलीट व्हायचं होतं. आणि तिने आपले स्वप्न साकार केले आहे. 2018 मध्ये, तिची SAI (साई) च्या मिडल आणि लाॅन्ग डिस्टेंन्स अकादमी, भोपाळसाठी निवड झाली. तिथे तिने माजी राष्ट्रीय खेळाडू प्रतिभा टोप्पो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.
सुप्रीतीचे यश
यादरम्यान तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिने पहिले राष्ट्रीय पदक 2019 क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये जिंकले होते. त्याच वर्षी, तिने राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 3000 मीटर शर्यतीतही कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 2020 मध्ये त्याने गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 3000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले. आणि ज्युनियर फेडरेशन कपच्या 3000 मीटर आणि 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.
“एका वाहिनीच्या मुलाखतीत तिला तिच्या आदर्शाविषयी विचारले असता, सर्वांना प्रेरित करणाऱ्या सुप्रीतीने 3000 मीटर स्टीपलचेस रेकॉर्ड धारक अविनाश साबळे यांचे नाव घेतले. तिने सांगितले की, ‘अविनाश साबळे हे सुध्दा गरीब कुटुंबातून आला आहे आणि तो माझ्यासाठी आदर्श आहे. जेव्हा जेव्हा मला प्रेरणेची गरज असते तेव्हा मी त्यांच्या स्पर्धेचे व्हिडिओ पाहते. तिने पुढे म्हटले की, ‘मी माझ्या वडिलांना पाहिलेले नाही, पण मला हे पदक त्यांना समर्पित करायचे आहे. आणि मला आशा आहे की मी भारतासाठी अनेक पदकही जिंकू शकेन.”
सुप्रीती 1 ते 6 ऑगस्ट दरम्यान कोलंबिया येथे होणार्या अंडर-20 जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. आणि आता तिला आशा आहे की ती तिथेही पदक जिंकेल.