Mahua Moitra: टीएमसी खासदार महुआ मोईत्रा सध्या एका वादामुळे चर्चेत आहेत. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात त्यांनी रोख रक्कम घेतल्याचे महुआ यांच्यावर आरोप आहेत. असा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. निशिकांत यांनी महुआ यांचे ‘माजी भागीदार’ जय अनंत देहदराई यांच्या पत्राच्या आधारे हे आरोप केले आणि चौकशीची मागणी केली आहे.
महुआ मोईत्रा ह्या एक कुशल वक्ता आणि उत्कृष्ट नेता म्हणून ओळखल्या जातात. त्या लोकसभेत नेहमीच सरकारची कोंडी करत असतात. सभागृहात दिलेली त्यांची भाषणे चांगलीच व्हायरल होतात. मात्र, महुआ राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी बँकर होत्या. TMC लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया…
अमेरिकेत शिक्षण –
महुआ मोईत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर विजयी झाल्या. महुआ यांचा जन्म 1974 साली आसामच्या कछार जिल्ह्यात झाला. महुआ यांनी शिक्षण राजधानी कोलकाता येथून घेतले. प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर महुआ यांच्या त्यांच्या कुटुंबाने पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवले. त्यांनी 1998 मध्ये मॅसॅच्युसेट्समधील माउंट होल्योक कॉलेज साउथ हॅडली येथून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी प्राप्त केली.
लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम –
शिक्षण पूर्ण केल्यानंतर महुआ यांनी प्रतिष्ठित बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन चेसमध्ये काम केले. त्यांनी न्यूयॉर्क आणि लंडन या दोन्ही ठिकाणी काम केले. तिथे त्या चांगल्या पदावर पोहोचल्या होत्या. येथे त्या करोडो रुपयांच्या पगारावर काम करत होत्या. जेपी मॉर्गनमध्ये काम करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट बँकरचा सरासरी पगार 1.21 लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे, जो भारतीय रुपयांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अनुभव वाढत गेल्यास पगारवाढ होऊन पगार कोटींवर पोहोचतो.
राजकीय प्रवास कसा सुरू झाला?
लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये काम करण्यात महुआ यांना विशेष आनंद वाटत नव्हता. त्यांना राजकारणाचा भाग बनून जनतेची सेवा करायची होती. त्यामुळे त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, एका वर्षातच त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि 2010 मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये (ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस) जाण्याचा निर्णय घेतला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख झपाट्याने वर चढू लागला.
टीएमसीने त्यांना 2016 मध्ये नादिया जिल्ह्यातील करीमपूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आणि येथून त्या विधानसभेत पोहोचल्या. टीएमसीने त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर तीन वर्षांनंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून तिकीट दिले. महुआ यांनीही पक्षाला निराश न करता येथून विजय मिळवला. अशा प्रकारे त्या पहिल्यांदा लोकसभेत पोहोचल्या.
घटस्फोट –
महुआ मोइत्रा यांनी लार्स ब्रॉर्सन या डॅनिश फायनान्सरशी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि नंतर दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. महुआ यांच्या आणखी एका माजी साथीदाराचे नाव सध्या चर्चेत आहे. जय अनंत देहदराई असे या व्यक्तीचे नाव असून ते सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. महुआ यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. सध्या महुआ ह्या दिल्लीत एकट्याच राहतात.