शेलपिंपळगाव – खेड तालुक्यातील दहा गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील इतर लहान मोठ्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे.
झिका डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य आजार आहे. तालुक्यातील मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनिया या आजारांचा उद्रेक झालेल्या गावांचा झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली.
झिका विषाणूच्या धर्तीवर खेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा दिवस रात्र कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात डेंग्यूसदृश परिस्थिती पाहता ग्रामपंचायत व आरोग्य सेवकांच्या मार्फत डेंग्यू व इतर विषाणू संदर्भात जनजागृती केली जात आहे.
अतिसंवेदनशील गावांमध्ये दिवसातून दोनदा धूर फवारणी, आठवड्यातुन एक कोरडा दिवस पाळणे, भारित कीटकनाशक मच्छर दाणी वाटप, सांडपाणी व गटारे वाहती करणे, खड्डे बुजवणे, योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे असे प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत.
भोसे ग्रामपंचायत मार्फत कीटकनाशके फवारणी तसेच धूर फवारणी करण्यात येत आहे. संपूर्ण गावात आठवड्यातून मंगळवार हा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला जाणार आहे. गावात झिका विषाणू व डेंग्यू विषाणू संदर्भात जनजागृती केली जात आहे. सांडपाणी एकाच ठिकाणी साठून राहू नये यासाठी संबंधित नागरिकांना नोटिसा बजावून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
-दीपक लोणारी, उपसरपंच भोसे
शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या हद्दीतील भोसे आणि मरकळ या उपकेंद्राची तातडीने बैठक घेऊन योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, भोसे, रासे, मरकळ या हद्दीत डेंग्यू सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने नागरिकांनी लक्षणे दिसतास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-डॉ. इंदिरा पारखे, आरोग्य अधिकारी शेलपिंपळगाव