शिंदे वासुली -चाकण, देहूरोड व तळेगाव दाभाडे अगदी जवळ असलेला चाकण औद्योगिक वसाहतीतील शांतताप्रिय, पावित्र निसर्गरम्य व नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य लाभलेला आणि धार्मिक अधिष्ठान असलेला भाचंद्र डोंगर पावसाळ्या वनराईने हिरवा शालू परिधान करून नटलेला आहे.
भामचंद्र डोंगराचे हिरवं सौंदर्य पाहून येथे येणारे भाविक, पर्यटक व निसर्गप्रेमी अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. सोमवार (दि. 9)पासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यातील दर सोमवारी आजूबाजूच्या परिसरातून आणि दूरवरून शेकडो भाविक देवदर्शनासाठी
येत असतात. येथील प्राचीन शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान असून पहाटे पासून अभिषेक, पूजा, आरती व दर्शन घेऊन आपले सोमवारचे व्रत करीत असता; मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे.
वासुली ग्रामपंचायत हद्दीतील या भामगीरी पर्वताचं दर्शन आणि येथील वास्तव्य म्हणजे वारकऱ्यांसाठी आत्मसुखाची पर्वणीच. पूर्व-पश्चिम दोन ते तीन किलोमीटर विस्तारलेला आणि मध्यंतरी भाळावर चंद्र लेलेला महादेवाचेच एक रुप जणू. म्हणूनच त्यास भामचंद्र म्हणून संबोधीत असावे.
डोंगरावरील काळ्या पाषाणात कोरीव शिल्प आणि प्राचिन गुहा पुराणकाळातील स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील महादेव मंदिर. डोंगराच्या पायथ्यापासून डोंगराचा संपूर्ण परिसर वनखात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य अबाधित आहे. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराला “क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असला तरी नैसर्गिक साधन
संपत्तीला धक्का न लावता दर्शन व पर्यटनासाठी येणाऱ्या भाविकांना काही आवश्यक सोयी सुविधा देण्याचे काम सुरू आहे. चाकण वनपरिक्षेत्राच्या माध्यमातून भामचंद्राच्या दर्शनी भागाला भक्कम तटबंदी करण्यात आली आहे. तर तीर्थक्षेत्र विकास निधी, जिल्हा परिषद निधी, स्थानिक ग्रामपंचायत वासुली व
भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या माध्यमातून पायथ्याशी हनुमान मंदिर परिसरात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय व डोंगरावर पिण्याचे पाणी व शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे. अजूनही डोंगरावर जाणे येण्यासाठी वनीकरण विभागाच्या सहकार्याने दगडी पायऱ्या, विश्राम गृह, सभामंडप, संत तुकाराम महाराज चरित्र व वारकरी संप्रदाय अभ्यासिका व ग्रंथ भांडार आदी सोयी सुविधा करण्यात येणार आहे.