पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला पैलवान खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. क्रीडा संकुलाचे उद्घाटन दिवाळीनंतर होणार आहे.
सदस्य राजेश पांडे यांनी बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर त्यास मान्यताही देण्यात आली.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्रीडा संकुलाचा निश्चितच फायदा होणार आहे. क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे खेळाडूंना ऑलम्पिकसह इतर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव करणे सोपे होणार आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा संकुलाला दिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मत राजेश पांडे यांनी व्यक्त केले होते.
महाविद्यालयीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा, या यासाठी विद्यापीठ आवारातील 27 एकर जागेत सर्व प्रकारचे इनडोअर व आऊट डोअर खेळ खेळण्याची सुविधा निर्माण केली. बालेवाडी येथील क्रीडा संकुलानंतर विद्यापीठातील क्रीडा संकुल हे सर्वात मोठे क्रीडा संकुल असणार आहे. त्यात रनिंग ट्रॅक, ऍथलॅटिक, टेनिस, खो-खो, कबड्डी, शूटिंग रेंज, बॅडमिंटन आदी 100 खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जलतरण तलावाचे काम दीड महिन्यात पूर्ण
विद्यापीठाने क्रीडा संकुलासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील काही रक्कम विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झाली असून काही रक्कम राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळाली आहे. उर्वरित रक्कम विद्यापीठाने स्वत: खर्च केली आहे. क्रीडा संकुलाच्या आवारात सुमारे 2 हजार क्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात आले आहे. हॉकी व जलतरण तलावाचे काम येत्या एक ते दीड महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.