लोणी धामणी – करोनाच्या प्रादुर्भावामुळे धामणी (ता. आंबेगाव) येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या पालखीची मिरवणूक यंदा काढण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. धामणीचे खंडोबा देवस्थान खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर या तालुक्यातील बहुसंख्य गावातील भाविकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे भाविक सोमवती अमावस्येला देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात.
सोमवारी (दि. 20) दिवसभर सोमवती अमावस्या असल्याने सकाळी वाघे व वीर मंडळींनी खंडोबाचा मुखवटा मंदिरातून भगताच्या विहिरीवर आणला. त्या ठिकाणी नित्य सेवेकरी व सोमवतीच्या मानकऱ्यांच्या हस्ते देवाच्या मुखवट्याला स्नान घालण्यात आले. यावेळी धार्मिक विधी व आरती करण्यात आली. त्यानंतर देवाचा मुखवटा दुचाकीवर म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात ठेऊन मंदिर बंद करण्यात आले.
सोमवती स्नानाच्या वेळी मानकरी नरके (तळेगाव ढमढेरे), राजगुरू (अवसरी खुर्द), गावडे (गावडेवाडी), पडवळ व आवटे (महाळुंगे पडवळ) येथील प्रत्येकी एक प्रतिनिधीसह दादाभाऊ भगत, धोंडीबा भगत, प्रभाकर भगत, राजेश भगत, सुभाष तांबे, शांताराम भगत, ज्ञानेश्वर जाधव (वाघे), सीताराम जाधव, दिनेश जाधव (वाघे), नामदेव पवार, सुरेश पवार (वीर) असे एकूण पंधरा जणांच्या उपस्थितीत स्नान सोहळा पार पडला.