करोनामुळे सोमवती अमावस्या साधेपणाने साजरी : मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत “श्रीं’ची पूजा
जेजुरी(प्रतिनिधी) :- अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवती उत्सव गडकोट आवारात अत्यंत साधेपणाने अन् मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
करोनामुळे सोमवती उत्सव व कऱ्हा नदी स्नानाचा सोहळा रद्द करण्यात आला होता. तर भाविकांसाठी दि. 18 मार्च पासून मंदिर बंद असल्याने सोमवती उत्सव भक्तांविना पार पडल्याने सोन्याची जेजुरी सोमवारी (दि. 20) सुनीसुनी दिसत होती.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1274899802849722/
गडावर सोमवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास पुजारी, नित्यवारकरी, सेवेकरी, मानकरी, देवसंस्थान कर्मचारी यांचे हस्ते मंदिरातील उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात येऊन गडकोट आवारात सनई-चौघड्याच्या निनादात सोमवती अमावस्या उत्सवातील कुलधर्म -कुलाचार, पूजा, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले.
विशेष म्हणजे हे विधी करताना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते. तर मुख्य मंदिराचा गाभरा व परिसर पानाफुलांनी सजविण्यात आला होता. तर बा खंडेराया करोना महामारीचा नायनाट करा… पाऊस पडू द्या… धनधान्य पिकू द्या.. बळीचे राज्य येऊ द्या,अशी प्रार्थना कुलदैवत मल्हारी मार्तंडाला करण्यात आली.
तर अनेक खांदेकरी मानकरी यांनी पुढील सोमवती उत्सव व पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडू दे, जत्रा, यात्रौत्सव पुन्हा सुरू होऊ दे अशी प्रार्थना केली व घरातच तळीभांडार, दिवटी पाजळून, भंडारा उधळून विधी साजरे केले.