khalistani Terrorist Arrested : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. रविवार आणि सोमवारी मध्यरात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर त्यांना अटक करण्यात आले आहे. दरम्यान, या दोन शूटर्सच्या अटकेनंतर एक धक्कादायक माहिती समोर आली असून या दोघांनी एका पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने या घटनेचा कसून तपास पोलीस करत आहेत.
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, पूर्व दिल्लीतील मयूर विहार परिसरात रविवार आणि सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि दोन हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका शूटर्सच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. पोलिसांच्या खूप प्रयत्नानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही शूटर्सला अटक करण्यात आली आहे. संबंधित दोघांनी एका पंजाबी गायकावर हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. एका खटल्यात पॅरोलवर सुटका झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दोघंही कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपचे साथीदार आहेत.
अर्शदीप याने २०२० मध्ये भारत सोडून कॅनडात पलायन केले आहे. दिल्ली पोलिसांसह पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्याच्या मागावर आहे. पण तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे.