लोणी काळभोर (पुणे) – पुणे शहराच्या पूर्व भागातील हवेली तालुक्याच्या 16 ग्रामपंचायत हद्दीत करोनाचा कहर सुरूच असून, मागील चार महिन्यांत 1723 करोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी चारशेहून अधिक ऍक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. तर वरील सोळा गावातील मृत्तांचा आकडा 33वर पोचला आहे.
उरुळी कांचन (227), मांजरी बुद्रुक (808), लोणी काळभोर (147), कदमवाकवस्ती (258), कुंजीरवाडी (66) व थेऊर (84) या सहा ग्रामपंचायत हद्दीत करोनाने धुमाकूळ घातला असून, या सहा ग्रामपंचायत हद्दीत करोनाबाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत अधिक माहिती देतांना हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, पूर्व हवेलीत विशेषतः उरुळी कांचन, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व थेऊर या सात ग्रामपंचायत हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. ग्रामपंचायत प्रशासन व नागरीकांनीही याबाबत ग्रांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
करोना रुग्ण वाढण्याची मुख्य कारणे…
- ग्रामपंचायत हद्दीतील ठिकठिकाणची बेकायदा भाजीपाला विक्री व होणारी बेसुमार गर्दी
- नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय बिनधास्त वावर
- सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- लग्न समारंभ, अंत्यसंस्कार अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीवरील कारवाईकडे होणारे दुर्लक्ष
- ग्रामपंचायत प्रशासन सुस्त तर महसुल विभाग आपण त्या गावचेच नाही या भूमिकेत
- करोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या चाचण्या न करणे
- स्वॅब चाचणी घेतल्यापासून रिपोर्ट हाती येईतोपर्यंत करोना पॉझिटिव्ह रुग्ण इतरांच्या संपर्कात येणे
- खासगी रुग्णालयात तपासणी झालेल्या रुग्णांची यादी
- प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळत नाही, परिणामी रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही, रुग्णाचे बिनधास्त फिरणे
- पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील मित्र मंडळी व नातेवाईक यांना सक्तीने क्वारंटाइन न करणे
- पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला परिसर सॅनिटायझेशन न करणे