खडकवासला : खडकवासला धरणात मित्रांबरोबर मस्ती करत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. योगेश नवनाथ नवले (वय १८, रा. बिबवेवाडी, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीएमआरडीए अग्निशमन दल व हवेली पोलीसांना पाण्यातून मृतदेह शोधून काढण्यात यश आले आहे.
मुळचा अहमदनगरच्या राशिन येथील असलेला योगेश कामासाठी पुण्यात आलेला होता. तो रविवार पेठेतील एका दुकानात कामाला होता. आज सुट्टी असल्याने तो त्याच्या इतर चार मित्रांसह खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता. योगेश व इतर चौघे चौपाटीजवळ खडकवासला धरणात उतरले. पाचही मित्रांची मिळून पाण्यात हुल्लडबाजी सुरू होती. मित्रांनी बाहेर आल्यावर अंगाला माती लावल्याने योगेश अंग धुण्यासाठी पुन्हा पाण्यात शिरला व दिसेनासा झाला.
पाण्यात गेलेला योगेश दिसेना म्हणून इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तेथून जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार विलास बांबळे, कॉन्स्टेबल मकसूद सय्यद, होमगार्ड शांताराम राठोड, प्रविण घुले व विजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार इंगवले, पंकज माळी, योगेश मायनाळे,सुरज इंगवले व अक्षय काळे या जवानांनी योगेश चा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
कालच शनिवार (दि.२) दोन जण बुडून मृत्यू झाले. आणि आज रविवार (दि.३) एकजण खडकवासला धरणात बुडून मृत्यू झाला . धरणाच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.असे असताना मासे पकडण्यासाठी ,पोहण्यासाठी मद्य प्रशान करण्यासाठी येत असतात .त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही .या तरुण मुलांना सुरक्षारक्षकांनी वेळीच हटकले असते तर ही दुर्घटना घडली नसती .अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याने धरण व परिसराच्या सुरक्षाबाबत ठोस उपाय योजना करणे अवश्यक बनले आहे .