खडकवासला धरण 82 टक्‍के भरले

File photo

संततधार पावसाने धरणसाखळी 10 टीएमसीजवळ

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने 9.66 टीएमसी म्हणजे 33.15 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे.

पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पाऊस समाधानकारक पडत आहे. धरण परिसरातही पावसाची संततधार सुरू असल्याने ओढे-नाले वाहत असून हे पाणी धरणात जमा होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, मंगळवारी धरण परिसरात पावसाचा जोर कमी होता. सोमवारी दिवसभरात खडकवासला धरणात 1 मिमी, पानशेतमध्ये 13 मिमी, वरसगावमध्ये 16 मिमी आणि टेमघर धरण परिसरात 25 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 9.66 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी 8.50 टीएमसी इतका पाणीसाठा होता.

आज विसर्ग
खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी नदीत न सोडता कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे 500 क्‍युसेकने कालव्यातून बुधवारी (दि.9) विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

धरणाचे नाव टक्के
खडकवासला 82.76 टक्के
पानशेत – 38.67 टक्के
वरसगाव – 26.99 टक्के
टेमघर – 12.15 टक्के

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here