पूर्वेकडील तालुक्‍यांत 73 हजार जनावरे छावण्यांमध्ये

चार लाख नागरिकांना 248 टॅंकरने पाणीपुरवठा : जुलै महिन्यातही भयावह स्थिती

सम्राट गायकवाड

सातारा – जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू झाला तरीही जुलै महिन्याच्या मध्यावर जिल्ह्याच्या सात तालुक्‍यांत अद्याप दुष्काळी परिस्थिती कायम आहे. पूर्वेकडील माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यांतील 124 चारा छावण्यांमध्ये 71 हजार 751 जनावरे तर माण तालुक्‍यातील शेळ्या- मेंढ्याच्या छावणीमध्ये एक हजार 181 जनावरे दाखल झालेली आहेत. त्याचबरोबर सात तालुक्‍यांमधील चार लाख सात हजार 252 नागरिकांना 248 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या पश्‍चिमेला पावसाला सुरुवात झाली मात्र, पूर्वेकडील तालुक्‍यांवर दुष्काळाचे ढग अद्याप कायम आहेत. माण तालुक्‍यात सर्वाधिक भीषण स्थिती असून 91 छावण्यांमध्ये 58 हजार 261 छोटी-मोठी जनावरे दाखल झालेली आहेत. त्यापैकी सर्वाधिक जनावरे म्हसवडमध्ये 7 हजार 387 इतकी आहेत. तसेच आंधळी 803, अनुभूलेवामध्ये 580, भालवडी 1 हजार 316, भाटकी 1 हजार 182, बिदाल 1 हजार 340, बिजवडी 778, बोडके- बोराटवाडी 436, बोडके 367, दहिवडी 999, दानवलेवाडी 540, देवापूर 599, ढाकणी 984, धामणी 1 हजार 510, दिडवाघवाडी 566, दिवड 1 हजार 81, दिवडी 439, गोंदवले खुर्द 635, हवालदारवाडी 543, हिंगणी 1 हजार 447, इंजबाव 717, जाधववाडी 483, जांभुळणी 815, जाशी 1 हजार 218, कासारवाडी 582, खुटबाव 574, कुकुडवाड 1 हजार 201, कुरणेवाडी 420, लोधवडे 502, माळवाडी (वर-म्हसवड) 1 हजार 551, मलवडी 708, मनकर्णवाडी 407, मार्डी 1 हजार 265, बोनेवाडी (दत्तनगर-म्हसवड) 579, म्हसवड येथील माळशिरस चौकातील छावणीत 575, मोगराळेत 413, मोही 1 हजार 441, नरवणे 436, पाचवड 638, पळशी 2 हजार 877, पळसावडे 412, पानवण 536, पांगरी (बिरोबानगर) 863, पर्यंती 455, पिंपरी 565, पिंगळी बु. 1 हजार 575, पुळकोटी 216, राजवडी 491, राणंद 473, सत्रेवाडी 575, शेनवडी 593, शेवरी 880, शिंदी बु. 191, शिंगणापूर 621, सोकासन 895, स्वरूपखानवाडी 691, तोंडले 426, वडगाव 1 हजार 500 , वडगाव-कोकरेवाडी 467, वर-मलवडी 347, विरळी 893, वळई 867, वडजल 323, वाकी 534, वावरहिरे 872 आणि येळेवाडी गावातील चारा छावणीत 547 जनावरे दाखल झाली आहेत.तसेच माण व खटाव तालुक्‍यात शेळ्या-मेंढ्यांसाठी देखील मंजूर तीन पैकी दोन छावण्यांमध्ये 1 हजार 81 जनावरे दाखल झाली आहेत.

त्यापैकी पिंगळी बु. 750 आणि डांभेवाडीमध्ये 331 जनावरे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर खटाव तालुक्‍यात 18 छावण्यांमध्ये 7 हजार 958 जनावरे दाखल झाली आहेत. त्यापैकी एनकूळ 768 , पडळ 678, तडवळे 1 हजार 406, पेडगाव 317, मांडवे 532, हिवरवाडी 621, कणसेवाडी 515, यलमरवाडी 863, निमसोड 414 , बोंबाळे 421, रणसिंगवाडी 575, खातवळ 399, पडळ 286 तर कणसेवाडीच्या चारा छावणीमध्ये 163 जनावरे दाखल झाली आहेत. तसेच फलटण तालुक्‍यात 7 चारा छावण्या मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी चालू 5 छावण्यांमध्ये 5 हजार 532 जनावरे दाखल झालेली आहेत. त्यापैकी सासवड 1 हजार 194, जावली 1 हजार 499, गिरवी 654, दुधेबावी 1 हजार 678 तर वडले गावातील छावणीमध्ये 507 जनावरे दाखल झाली आहेत.

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्‍यांमध्ये पाणीपुरवठ्याचे टॅंकर सुरू होते. जूनअखेर झालेल्या पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर आणि सातारा तालुक्‍यातील गावांचा टॅंकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित सात तालुक्‍यांमध्ये अद्याप टॅंकर सुरू आहेत. त्यामध्ये सर्वाधिक टॅंकर माण तालुक्‍यामध्ये सुरू आहेत. माण तालुक्‍यातील 83 गावे आणि 642 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख 48 हजार 729 नागरिकांना 120 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

फलटण तालुक्‍यातील 46 गावे आणि 181 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख 16 हजार 519 नागरिकांना 48 टॅकरने तर खटाव तालुक्‍यातील 52 गावे आणि 171 वाड्या-वस्त्यांवरील 90 हजार 114 नागरिकांना 43 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कोरेगाव तालुक्‍यातील 23 गावे आणि एका वाडीतील 36 हजार 57 नागरिकांना 49 टॅंकरने, खंडाळा तालुक्‍यातील तीन गावांतील पाच हजार 745 नागरिकांना पाच टॅंकरने, वाई तालुक्‍यातील आठ गावे आणि चार वाड्या- वस्त्यांवरील सहा हजार 383 नागरिकांना सात टॅंकरने, कराड तालुक्‍यातील सात गावांतील तीन हजार 705 नागरिकांना तीन टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

चारा छावण्यांची मुदत ऑगस्टपर्यंतच

चारा छावण्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, जुलैच्या मध्यावर विशेषत: माण, खटाव तालुक्‍यातील पर्जन्यमान आणि चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या पाहता ऑगस्टनंतरदेखील छावण्या सुरू ठेवाव्या लागणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, जोपर्यंत माण आणि खटाव तालुक्‍यात समाधानकारक पाऊस आणि चाऱ्याची निर्मिती होणार नाही, तोपर्यंत चारा छावण्या सुरूच राहतील. त्यासाठी सरकार आणि मंत्र्यांशी संवाद साधून तोडगा काढण्यात येईल, असे गोरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.