पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा खडकी येथील उपबाजार पुन्हा बंद करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजाराच्या अडीच किलोमीटर परिसरात करोनाग्रस्त रुग्णआढळून आल्याने पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तू असलेला भाजीपाला बाजार सुरळीत व्हावा यासाठी पोलीस, कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व बाजार समिती यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली. यावेळी करोनाग्रस्त भागातील नागरिकांना बाजार आवारात प्रवेश न देता बाजार आवार सुरू करण्याच्या सूचना बाजार समितीच्या वतीने करण्यात आल्या. मात्र, पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासन बाजार बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना कळवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.