वाघोली (पुणे) – केसनंद गावचा सर्वांगिण विकास हेच ध्येय डोळयासमोर ठेवले आहे. येत्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सर्व सहकाऱ्यांच्या साथीने गावात पाच मोठी विकासकामे करून केसनंद ग्रामपंचायतीचा लौकिक जिल्हयात वाढविणार आहे, असा विश्वास ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनलच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
केसनंद (ता. हवेली) गावच्या सरपंचपदी रोहिणी सचिन जाधव यांची तर उपसरपंचपदी सुनीता दिनेश झांबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार आला. यावेळी सर्व सदस्यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
हवेली तालुक्यातील महत्वपूर्ण अशा केसनंद ग्रामपंचायतीत ओम भगवती श्री जोगेश्वरी पॅनेलचे वर्चस्व आहे.
त्यामुळे आज सरपंच, उपसरपंचपदाची निवडणुक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित होते. सरपंच, उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकेकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी घोगरे यांनी सरपंचपदी रोहिणी जाधव यांची तर उपसरपंचपदी सुनीता झांबरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी तसेच तलाठी बाळासाहेब लाखे यांनी त्यांना सहाय केले.