अहमदाबाद – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. आज अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ‘भाजप मागच्या दारातून सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करत आहे.’
अहमदाबादमध्ये पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे लोक म्हणत आहेत की,’मेधा पाटकर आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील का? यावर माझे उत्तर असे आहे की, ‘मी असेही ऐकले आहे की मोदीजी मागच्या दारातून सोनिया गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवत आहेत. काँग्रेस संपली आहे, त्यांचे प्रश्न घेणे बंद करा, असेही ते म्हणाले.
यावेळी केजरीवालांनी दिलेली आश्वासने पुढील प्रमाणे-
– आमचा कोणीही मुख्यमंत्री, मंत्री, आमदार असो, आमचा कोणताही खासदार असो, इतर कोणाचाही असो, कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही. भ्रष्टाचार केला तर तुरुंगात पाठवू.
– गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या विकासावर खर्च केला जाईल.
-तुमचे सरकार आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक काम सरकारमध्ये कोणतीही लाच न घेता होईल.
-अशी व्यवस्था करणार की कामासाठी जावे लागणार नाही. सरकार तुमच्या घरी येईल.
-दिल्लीत डोअरस्टेप डिलिव्हरी योजना लागू आहे.
-नेते, मंत्री, आमदार यांचे सर्व काळे धंदे बंद होतील. विषारी दारू विकली जात आहे त्यावरही कारवाई केली जाईल.
-पेपरफुटी थांबवली जाईल, मागील पेपर फुटीची प्रकरणे उघडून दोषींना तुरुंगात टाकले जाईल.
-या लोकांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व मोठ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. लुटलेले पैसे परत मिळतील आणि त्या पैशातून तुमच्या शाळा-रुग्णालये बांधली जातील, वीज-रस्ते चालतील.