सविंदणे -कवठे येमाई (ता. शिरूर) येथे तीन करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कवठे येमाई हे गाव 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) घोषित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात बॅंक, दवाखान्यांसहीत संपूर्ण प्रकारच्या आस्थापना (दि.19) पासून 14 दिवस बंद राहील. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कवठे येमाई परिसर केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटरचा परिसर हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित केले आहे. कवठे येमाई परिसरात तीन ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत.
पोलीस, होमगार्ड, शिक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी दिली आहे. सध्या सविंदणे, कवठे येमाई, टाकळीहाजी, कान्हूर मेसाई, चांडोह, फाकटे, जांबूत गावांमध्ये मुंबई-पुण्यावरून अनेक नागरिक दाखल झाले आहेत.
त्यामुळे या भागांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.घराच्या बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल, असे वर्तन करू नये. बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची शेजारच्यांनी त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन सविंदणेचे सरपंच संतोष मिंडे यांनी केले आहे.