मुंबई -आयपीएल स्पर्धेत 2014 साली वयाच्या 40 व्या वर्षी पदार्पण केलेल्या ‘प्रविण तांबे’ या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सध्या या बायोपिकची सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. मराठमोळा अभिनेता ‘श्रेयश तळपदे’ या चित्रपटात प्रवीण तांबे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी “कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, सिनेरसिकांना आणि क्रिकेट प्रेमींनी या ट्रेलरला मोठी पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात श्रेयशची एक अनोखी शैली पाहायला मिळत आहे. “कौन प्रवीण तांबे?’ माध्यमातून श्रेयस जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तो ‘इक्बाल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
दरम्यान, “कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट उद्या म्हणजेच 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र तमिळ तेलुगू या प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असताना मराठी भाषेत प्रदर्शित होण्याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही.
अभिनेता मराठी, ज्या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे तो क्रिकेटपटू मराठी. असं असताना चित्रपट मात्र मराठी भाषेत प्रदर्शित होत नसल्यानं नेटकऱ्यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. “हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला पाहिजे…’ या प्रकारच्या कमेंट युजर्सने केल्या आहेत.