मंचर/अवसरी -आंबेगाव तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 154 झाली आहे. शनिवारी एकाच दिवसात 26 करोनाचे रुग्ण आढळुन आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचर शहरातील करोना बाधितांची संख्या 46 झाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.
शनिवारी दिवसभरात मंचर येथे 9 पुरुष 5 महिला, महाळुंगे पडवळ येथे 3 पुरुष 1 महिला, मेंगडेवाडी येथील 1 पुरुष, अवसरी खुर्द 1 पुरुष, अवसरी बुद्रुक 1 महिला, पोंदेवाडी येथे 1 पुरुष, कळंब 1 महिला, पारगाव 1 पुरुष, चास 1 पुरुष, घोडेगाव 1 महिला असे एकुण 26 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहेत. एकूण 75 रुग्ण बरे झाले आहेत. 4 जण मयत तर एकूण 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी धसका घेतल्याचे दिसुन येत आहे.नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडु नये. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा.अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांत बाहेर गावावरुन येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील नागरिक घरात थांबणार असुन बाहेर गावावरुन गावात कोणीही येऊ नये. गावातील रस्ते आणि परिसरात फवारणी करुन निर्जतुकीकरण केले जाणार आहे, असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.