नांदेड: नांदेडमधील आणखी एका आमदाराला करोनाचा संसर्ग झाला आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर यांची नुकतीच करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहेत. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील कॉंग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. माधवराव जवळगावकर हे नांदेड कॉंग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी मिळवली.
माधवराव जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे करोनाबाधित आमदार ठरले आहेत. याआधी कॉंग्रेसच्याच तीन आमदारांना करोनाची लागण झाली होती. करोना पॉझिटिव्ह आलेले कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि ठाकरे सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच मोहन हंबर्डे यांनी करोनावर मात केली आहे. तर विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही मुंबईतच उपचार सुरु आहेत.
दरम्यान, अशोक चव्हाण यांना 4 जून रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. करोनाची लागण झाल्यामुळे चव्हाण यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते.