नवी दिल्ली – कर्नाटक विधासभांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशात दोन्हही पक्ष प्रचारासाठी संपूर्ण ताकद आजमावताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी ९ एप्रिल रोजी कर्नाटकातील कोलार येथे विराट सभा घेणार आहेत. यादरम्यान ९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी देखील राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करत राहुल गांधींच्या सभेबद्दल माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘राहुल गांधी ९ एप्रिल रोजी कोलारमध्ये मेगा रॅलीला संबोधित करतील. 11 एप्रिल रोजी ते वायनाडला भेट देतील.”
10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. भाजपने देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली असून प्रमुख नेते राज्यभर सभा आणि रॅली करताहेत.
टायगर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ एप्रिल रोजी कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी जाण्याची शक्यता आहे.तसेच याच दिवशी पंतप्रधान मोदी जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली देखील काढू शकतात.
13 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना जनता नाकारेल, असे जनता दल-सेक्युलरच्या नेत्यांनी म्हटले आहे.