बंगळुरू : कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील एका 65 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा कर्नाटकातील कोरोनामुळे झालेला तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
या बाधिताचा मृत्यू शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाला. त्यांच्या कुटुंबातील 20 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णातील दोन आणि सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टरचे विलगीकरण करण्यात आले आहे. या बाधिताचा चाचणीचा अहवाल गुरूवारी रात्री आला. मात्र शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
हा बाधित सात मार्च रोजी दिल्लीला संपर्क क्रांती एक्सप्रेसने गेला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत 13 जणांचा गट होता. 7 ते 11 मार्च दरम्यान ते जामा मस्जीदीत वास्तव्यास होते. त्यानंतर 11 मार्चला ते कोंगू एक्सप्रेसने यशवंतपूरला उतरले. त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने चित्रदूर्गला उतरले, असे त्यांनी सांगितले. त्यांचा हा प्रवास पाहता कर्नाटक शासनाची झोप उडणार हे निश्चित आहे.