बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे कार्यालय आणि निवासस्थान असणाऱ्या येथील कृष्णा बंगल्यात कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे संबंधित बंगला सील करण्यात आला. तसेच, येडियुरप्पा यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे.
येडियुरप्पा यांचे कार्यालय आणि निवासस्थान निर्जंतुकीकरणासाठी पाच दिवस सील करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा तसे पाऊल उचलण्यात आले आहे. याआधी महिनाभरापूर्वी कृष्णा बंगला सील करण्यात आला होता. आता येडियुरप्पा काही दिवस घरात राहूनच राज्याचा कारभार पाहणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील जनतेने खबरदारी बाळगून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहनही येडियुरप्पा यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटकमधील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या राज्यातील बाधित संख्येने गुरुवारीच 30 हजारांचा टप्पा ओलांडला. कर्नाटकमधील करोनाबळींची संख्या 500 च्या घरात पोहोचली आहे.