खालापूर (वार्ताहर) – दीपक ब्रदर्स, रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्जत – खालापूर श्रीचा मानकरी ए. जे. फिटनेस जीम वाशिवलीचा जुगल शेवळे ठरला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला समोरील पटांगणात ही स्पर्धा झाली. दीपक ब्रदर्सचे संस्थापक विकी गायकवाड, माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक शीतर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य आकर्षण महाराष्ट्र श्री – मिस्टर इंडिया मिस्टर युनिव्हर्स उदय देवरे उपस्थित होते.
या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील 55 ते 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर श्री 2024 चा मानकरी ए. जे. फिटनेस जीम – वाशिवलीचा जुगल शेवळे ठरला. बेस्ट इंप्रुवेमेंट अभिजीत पाटील, बेस्ट पोझर प्रशांत मोकल ए. जे. फिटनेस वशिवली यांनी किताब पटकावला. या वेळी उदय देवरे यांनीही प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची मने जिंकली. उष्मा वाढल्याने वर्कआउट जास्त करू नका, जेवण वेळेवर करा, शरीराकडे लक्ष देण्याचे अवाहन देवरे यांनी केले.