Live Cricket Score, PBKS vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला गेला.रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 19.1 षटकांत 183 धावा करत सर्वबाद झाला. पंजाबकडून आशुतोष शर्माने शानदार खेळी केली. मात्र, ही खेळी कामी येऊ शकली नाही. आशुतोषने 28 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 षटकार आणि 2 चौकार मारले. याव्यतिरिक्त शशांक सिंगने 41 धावा केल्या.
विजयासाठी 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरूवात अतिशय खराब झाली. पंजाबनं 6.5 षटकात 49 धावसंख्येवरच पाच गडी गमावले होते. पंजाब किंग्सला पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंगच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा झेल पकडला. त्याला आपलं खातही खोलता आलं नाही. त्यानंतर जसप्रीत बुमराहने डावाच्या दुसऱ्याच षटकात पंजाबला दुसरा धक्का दिला. त्याने रिले रुसोला क्लीनबोल्ड केलंं. पहिला सामना खेळणाऱ्या फलंदाजाला फक्त एक धाव करता आली. जसप्रीत बुमराहनेच पंजाबला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधार सॅम करनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डावाच्या दुसऱ्या षटकात त्याने दोन बळी घेतले. कर्णधाराला केवळ सहा धावा करता आल्या.
पंजाबच्या टॉप ऑर्डरला विशेष काही कामगिरी करता आली नाही. संघाला 2.1 षटकात अवघ्या 14 धावसंख्येवर चौथा धक्का बसला. गेराल्ड कोएत्झीने लियाम लिव्हिंगस्टोनला स्वत: झेलबाद केले. त्याला एकच धाव करता आली. पंजाबला 6.5 षटकात 49 धावांवर पाचवा धक्का बसला. श्रेयस गोपालने हरप्रीत सिंगला आपला शिकार बनवले. त्याला केवळ 13 धावा करता आल्या.
त्यानंतर आकाश मढवालच्या गोलंदाजीवर जितेश शर्मा 9 धावा करून पायचीत झाला आणि पंजाबचे 6 फलंदाज 10 षटकाच्या आतच माघारी परतले होते. 9.2 षटकात 77 धावसंख्येवर पंजाबला सहावा धक्का बसला. त्यानंतर पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला. शशांक सिंग चांगल्या खेळीनंतर बाद झाला. शशांक 25 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. जसप्रीत बुमराहने शशांकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंजाबच्या आशा पूर्णत: शशांक सिंगवर टिकल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण जसप्रीत बुमराहने त्याचा डाव हाणून पाडला. अशाप्रकारे 12.1 षटकात 111 धावसंख्येवर पंजाबचे 7 गडी तंबूत परतले होते.
शेवटच्या 6 षटकात पंजाब किंग्जला विजयासाठी 65 धावा हव्या होत्या, पण फक्त 3 विकेट्स हातात होत्या. पण दुसऱ्या टोकाला आशुतोष शर्मा तुफानी शैलीत फलंदाजी करत होता. जेव्हा आकाश मधवाल डावातील 16 वे षटक टाकायला आला तेव्हा त्याने या षटकात 24 धावा दिल्या. इथून सामना एकतर्फी दिसू लागला कारण आता पंजाबला 24 चेंडूत फक्त 28 धावांची गरज होती.18व्या षटकात आशुतोषची विकेट पडल्यानंतर सामना रखडला होता. शेवटच्या 2 षटकात पंजाबला 23 धावांची गरज होती. 20 चेंडूत 21 धावा करून हरप्रीत ब्रार बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या जवळपास सर्व आशा संपल्या होत्या. रबाडा धावबाद होताच पंजाबचा संघ 183 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईने हा सामना 9 धावांनी जिंकला.
मुंबई इंडियन्सच्या वतीने जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये पंजाब किंग्जला बॅकफूटवर आणले होते. दोघांनीही चांगली गोलंदाजी करत आपापल्या 4 षटकांत 3-3 बळी घेतले. बुमराह आता आयपीएल 2024 मध्ये 13 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आला आहे. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्या, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. विशेषत: आकाश आणि श्रेयस गोपाल यांनी खूप धावा दिल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक झळकावले. 360 डिग्री फलंदाजाने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या.
A strong total on the board, now onto the bowlers! 👊
Let’s go, Paltan 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #PBKSvMI pic.twitter.com/H7N8M9aq6N
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2024
मुंबईला पहिला धक्का बसला तो केवळ आठ धावा करू शकलेल्या इशान किशनच्या रूपाने. रबाडाने त्याला आपला बळी बनवले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्याने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 25 चेंडूत 36 धावा केल्या. त्याच्या 250 व्या आयपीएल सामन्यात त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले.
यानंतर सूर्याने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्याला सॅम करनने 148 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो केवळ 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याव्यतिरिक्त या सामन्यात टीम डेव्हिडने 14 धावा, रोमॅरियो शेफर्डने एक धाव आणि मोहम्मद नबी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
तिलक वर्मा यानेही पंजाबविरुद्ध आक्रमक खेळी केली. त्याने 18 चेंडूचा सामना करताना 188.88 च्या स्ट्राइक रेटने 34 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि दोन षटकार आले. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात कहर केला. त्याने तीन विकेट घेतल्या. पंजाबसाठी त्याने या सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्या. सॅम करनने दोन तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.