Entertainment: राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रू’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटात करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन झळकणार आहे. नुकताच फर्स्ट लूक व्हिडिओ जारी करून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. त्याच वेळी यातील तिन्ही अभिनेत्रींच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्रिती सेननने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘द क्रू’ चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. तिन्ही अभिनेत्री त्यांच्या लाल रंगाचा फ्लाइट अटेंडंट गणवेश परिधान करून छान दिसत आहेत. पोस्टर शेअर करताना क्रितीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चेक इन करण्यासाठी सज्ज व्हा, आता द क्रूसोबत उडण्याची वेळ आली आहे.’ विशेष म्हणजे पहिल्यांदाचा या सिनेमाच्या माध्यमातून या तिन्ही अभिनेत्री एकत्र पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
करीना, तब्बू आणि क्रितीच्या ह्या नव्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. रेड कलरच्या एअरहॉस्टेसच्या ड्रेसमध्ये या तिघीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटाचा पोस्टर या तिघींनीही इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेआहे. राजेश कृष्णन चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि एकता कपूर या दोघींनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘द क्रु’ हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी निर्माते हा चित्रपट 22 मार्चला रिलीज करण्याचा विचार करत होते. या चित्रपटाची कथा तीन महिलांवर आधारित आहे. चित्रपटामध्ये करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त कपिल शर्मा आणि दिलझीत दोसांझही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.